मुंबई : धावती मुंबई, झगमटातली मुंबई, दिवसातली मुंबई, रात्रीची मुंबई, गर्दीची मुंबई, कितीही फिरलं तरी काही तरी उरलंय असं वाटायला लावणारी मुंबई... एका शहराचे एक ना विविध रुपं...   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे शहर दिवसा जितकं वेगवान आणि गजबजलेलं असतं, रात्री तितकंच शांत आणि देखणं दिसतं. दिवसा सूर्यप्रकाशात लख्ख दिसणारी मुंबई रात्री दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघते. शहरातील प्रत्येक कोपरा, इमारती, सार्वजनिक ठिकाणं, गाड्या, रेल्वे, समुद्रकिनारे येथे प्रकाशाचा आणि पाण्यातील प्रतिबिंबाचा खेळ अव्याहतपणे सुरू असतो. हिच रात्रीची लुकलुकणारी मुंबई जलरंगाच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांनी केला आहे.


 'डार्क अॅन्ड लाईट्स ऑफ मुंबई'

कॅन्व्हासवर रंगलेली मुंबई


कॅन्व्हासचा आकार लहान असो वा मोठा जलरंग हे सर्वात कठीण माध्यम मानलं जातं. कारण त्यामध्ये चुकीला वाव नसतो म्हणून हे धाडस फारसं कुणी करत नाही. सुरेश भोसले यांचा यामध्ये विशेष हातखंडा आहे. लहानपणापासूनच मुंबईच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेल्या भोसले यांनी यापूर्वीही हे शहर कॅन्व्हासवर चितारलं आहे.


'मुंबई'च्या भव्यतेची प्रचिती


रात्री लखलखणारे दिवे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, पावसाळ्यात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चालणारा प्रतिमांचा खेळही पहिल्यांदाच जलरंगात रंगवलेल्या साडे आठ बाय चाडे चार फूट लांबीच्या दोन मोठ्या चित्रांमधून पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भाऊचा धक्का, वरळी सी फेस, मुंबई मेट्रो, शिवसेना भवन आणि एअरपोर्टसारखी मुंबईची ओळख असलेली सर्व ठिकाणं जलरंगात रंगलेली पाहायची असतील तर कलाप्रेमींसाठी ही एक चांगली संधी आहे... 


'डार्क अॅन्ड लाईट्स ऑफ मुंबई'


मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये  १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान भरणाऱ्या 'डार्क अॅन्ड लाईट्स ऑफ मुंबई' या चित्रप्रदर्शनामध्ये मुंबईकरांना जलरंगात रंगवलेली मुंबई मोठ्या कॅन्व्हासवर पाहायला मिळणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तुम्ही या प्रदर्शनाला भेट देऊ शकाल.