मुंबई : मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला दाऊदच्या हस्तकाला अटक करण्यात यश आलं आहे. रामदास रहाणे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अहमदनगरमधील संगमनेर येथून अटक केली. मुंबईतील एका व्यवसायीकावर हल्ला करण्याची सुपारी रामदासला देण्यात आली होती. मात्र वेळीच त्याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी रामदास कडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका व्यावसायिकाने दुबईत हॉटेलचा व्यवसाय सुरु केला होता या ह़ॉटेलमध्ये याच्या मित्राने सुमारे पाच लाख धिरमची गुंतवणूक केली होती. २००१ साली दाऊदच्या इशाऱ्यावरून या गुतवणूकदाराची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मुंबईतील या व्यवसायीकाकडून पाच लाख धिरम दाऊद गँगनं वसूल केले होते. काही महिन्यांपासून फिर्यादीला पुन्हा पाकिस्तानातून खंडणीसाठी घमकावलं जात होत. या व्यवसायीकाकडून ५० लाखांची खंडणीची मागणी केली जात होती. अन्यथा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 


धमकी येताच व्यवसायीकाने पोलिसांत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य बघता मुंबई पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण सुद्धा देऊ केले होते. दरम्यान खंडणी विरोधी पथकाचा समांतर तपास सुरू होता. या तपासाला यश आलं असून दाऊदचा हस्तक असलेल्या रामदास रहाणेच्या मुसक्या आवळल्या.