मुंबई :  येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामं आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा विशेषतः राडारोडा (debris) व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक घेण्यात आली. 


मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी. मुंबईत डेब्रिज तयार होण्याच्या ४५० जागा असून ३१ मे पर्यंत हे डेब्रिज साफ करण्याची कार्यवाही एमएमआरडीए आणि मुंबई मनपाने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 


कांदिवली भागात मेट्रोची जी कामं सुरु आहेत, त्या ठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यात यावं, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांमधील ४७ कल्व्हर्ट तसंच मुंबई महानगरातील रेल्वे ट्रॅकवरील ४० कल्व्हर्ट स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


डास, मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा, असं सांगून  ज्या भागांमध्ये मेट्रोसह इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेऊन डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी संबंधित कंत्राटदारांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 


संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना द्याव्यात असे सांगून अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.


मुंबईत पावसाळापूर्व कामांसाठी विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचं आणि सुरु असलेल्या कामांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केलं.