मुंबई : राज्यातील मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सामाजिक न्याय विभागातर्फे सर्व महाविद्यालयांचे लेखा परीक्षण म्हणजेच ऑडीट केले जाणार आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मेट्रीकेत्तर शिष्यवृत्तीमध्ये 2174 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त झी २४ तासने  दाखवले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या घोटाळ्याची चौकशी करणा-या एसआयटीचा अहवालच झी २४ तासच्या हाती आलाय. घोटाळ्याची ही रक्कम संबंधित शिक्षण संस्थांकडून वसुल करावी अशी शिफारस एसआयटीने आपल्या अहवालात दिलीय. 


एसआटीने सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येणा-या केवळ 13 टक्के शिक्षण संस्थांची तपासणी केली होती. त्यामुळेच आता सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातील सर्वच शिक्षण संस्थांचे लेखापरीक्षण करून याबाबतची सखोल चौकशी केली जाणार आहे.


 त्यानुसार या रकमेची वसुली करण्याचे काम जिल्हा सामाजिक न्याय अधिका-यांकडे सोपवले जाणार आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी बैठक बोलवली आहे.