मुंबई : लॉकडाऊनच्या या काळात सर्वत्र निर्मनुष्य वातावरण असल्यानं आता जंगलातून प्राणी बाहेर पडून थेट मानवी वस्त्यांमध्ये फिरत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. भांडूप पश्चिम येथील हनुमान टेकडी परिसरातही अशीच एक घटना घडली. येथील संगिता सिंग यांच्या घरावर हरिणाने उडी मारली असता सिमेंटचा पत्रा फुटून हरिण थेट घरात कोसळले. थेट घरातच हरिण कोसळल्यानं सिंग यांच्या घरातले चांगलेच घाबरले गेले. यानंतर हे हरिण पाहण्यासाठी मोठी गर्दीही झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंचावरून कोसळल्यानं त्याच्या पायाला जखम झाली होती, त्यामुळं त्याला हलताही येत नव्हते. या प्रकरणाची माहिती अखेर वनखात्याला मिळाल्यानंतर या खात्याचे अधिकारी, पोलीस आणि पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. हरणाव प्राथमिक उपचार करून वनखात्यानं हरिणाला आपल्या ताब्यात घेतले. 



हनुमान टेकडीच्या मागील बाजूस विहार तलावाचा भाग लागतो. जो पूर्णतः जंगलानं व्यापलेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे हरिण या भागात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी देखील अनेक प्राणी रसत्यावर फिरताना दिसून आले होते. कोरोनामुळे मुंबई थांबली आहे. गाड्यांची वाहतूक नसल्यानं गजबजलेले रस्ते मोकळे झाले आहे. 


कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईकर घरा बाहेर पडणं टाळत आहेत. याचाच फायदा प्राण्यांनी घेतला आहे. मुंबईतल्या काही भागात निरव शांतता आहे. अशा परिस्थितीत अनेक प्राणी रस्त्यावर वावरताना दिसत आहे.