मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !
डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai)
मुंबई : बातमी आहे आरोग्याबाबत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai) त्यामुळे मुंबईचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.
दरम्यान, पुरेशा लससाठ्याअभावी मुंबईत लसीकरणाला ब्रेक लागला आहे. आज लसीकरण बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर कोरोनाच्या काही निर्बंधामुळे मुंबई, ठाण्यातील दुकाने सुरू असली तर मॉल बंदच राहणार आहेत. ठाण्यात रात्री 10पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरात व्यापाऱ्यांनी जल्लोष केला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले आहे. धारावीत कोरोनाचा सातव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्राच्या लस वाटपटाच्या धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशला लसींच्या 56 लाख अधिक मात्रा दिल्याचं समोर आले आहे. देशभरात उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 3 कोटी 84 लाख मात्रा देण्यात आल्यात. तर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 3 कोटी 28 लाख मात्रा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र हे लसवाटप धोरण निकषांनुसार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.