`ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...` देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
आजचा मोर्चा केवळ राजकीयदृष्या काढण्यात आल्याचा टोला, उद्धव ठाकरे जसे नॅनो तसा आजचा मोर्चा नॅनो असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Devendra Fadanvis on Morcha : महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (MahaVikas Aghadi Morcha) आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Maha Morcha) काढला. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार याचं भाकित वर्तवलं. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
'आम्ही त्यांच्या नाकाखालून त्यांचं सरकार नेलं'
ज्यांना स्वत:चं सरकार टीकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केलं, हे सरकार टिकणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) रहाणार, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणूक लढवणार आणि पुन्हा आमचंच सरकार या महाराष्ट्रात येणार असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
आजचा मोर्चा राजकीय
आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे, जे लोकं संताना शिव्या देतात, देव-देवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, कोणत्या साली झाला हे माहित नाही, अशी मंडळी कोणत्या तोंडाने आज मोर्चा काढतायत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
सावरकरांचा अपमान झाला तेव्हा शिवसेना कुठे होती?
महाराष्ट्रात कोणत्याही महापुरुषांचे अपमान होऊ नयेत या मताचे आम्ही आहोत, तो जर कोणी करत असेल ते योग्य नाही, हे वारंवार सांगितलं आहे, पण जाणीवपूर्वक त्याला राजकीय मुद्दा बनवला जात आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे, ज्यावेळी स्वांतत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर का नाही बोललात, स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? त्यामुळे मला असं वाटतं की ज्याप्रकारे केवळ राजकीय भांडवलं करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
साठ वर्षात त्यांच्या पक्षाने काय केलं?
हे तीन पक्ष विसरले आहेत, की महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) हा प्रश्न हे सरकार आल्यावर सुरु झालेलं नाहीए, गेली साठ वर्ष हा प्रश्न सुरु आहे. ज्या पक्षांनी इतके वर्ष राज्य केलं त्या लोकांनी यावर काहीही केलेलं नाही. आणि आता कोणत्या तोंडाने ही लोकं सांगतायत, त्यामुळे निव्वळ काही मुद्दे न उरल्याने राजकीय दृष्ट्या काढलेला हा मोर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत आणि उद्याही रहातील.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच डाव?
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप केला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. उद्धव ठाकरे यांची कॅसेट गेली दहा वर्ष तिथेच अडकली आहे, मुंबईला महाराष्ट्रपासून कोणीच तोडू शकत नाही, भारताचं संविधान सर्वोच्च आहे, हे माहित असताना किती दिवस तोच तोच डायलॉग ते मारणार आहेत, आजच्या त्यांच्या भाषणात एकही नविन मुद्दा नव्हता, केवळ शिवराळ भाषा वापरायची, एवढ्यापुरता त्यांनी भाषण केलेलं आहे, त्यांनी आता काही नविन लोकं नेमली पाहिजेत, जे त्यांना दोन तीन नविन मुद्दे लिहून देतील असा टोला त्यांनी लगावला.