मुंबई : सोमवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनातही बरीच सावधगिरी बाळगली गेली. ज्याअंतर्गत अधिवेशऩासाठी येणाऱ्या प्रत्येकाचीच कोरोना चाचणीही करण्यात आली. पण, या चाचण्यांचे रिपोर्ट टप्प्याटप्प्यानं देण्यात आल्यामुळं अनेकांना प्रदीर्घ प्रतिक्षाही करावी लागली. या साऱ्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या अंदाजाची चर्चाही झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना चाचणीचा अहवाल पाहूनच विधीमंडळात प्रवेश देण्याची अट पुढे करण्यात आली होती. पण काहींचीच चाचणी होऊनही या नेतेमंडळींना त्याचे रिपोर्ट मात्र सुपूर्द करण्यात आले नव्हते. त्यामुळं काहीशी गोंधळाची परिस्थिती उदभवली. अपेक्षित कालावधी उलटूनही रिपोर्ट हाती न आल्यामुळं आमदारांना आत प्रवेश नाकारला गेला. याचवेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


भाजप, शिवसेना आमदारांना प्रवेशद्वारावर अडवलं जात असल्याचं पाहताच अखेर अजिच पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. ज्यानंतर त्यांनी आपल्या शैलीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. रिपोर्ट मिळाला नाही, मग कामकाज कसं चालायचं? म्हणत सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देत अजित पवार यानी त्यांना आत प्रवेश देण्याचा आदेश दिला. ज्यानंतर रिपोर्ट देण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची पळापळ पाहायला मिळाली. 


 


अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर अखेर संबंधित आमदारांना त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट तर मिळालाच, सोबतच विधिमंडळात प्रवेशही मिळाला. त्यामुळं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार चर्चेत राहिले ते एका वेगळ्या कारणामुळं असं म्हणायला हरकत नाही.