देवेंद्र फडणवीसांनी स्मृतीस्थळावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली
देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवतिर्थावर जावून आदरांजली वाहिली. याआधी सकाळी ट्विट करुन देखील त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला असं म्हटलं आहे. ट्विटबरोबरच त्यांनी एक व्हि़डिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांसोबतच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत.
शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
गेल्या स्मृतीदिनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं स्मृतीस्थळावर मनोमिलन झालं होतं. ती दृष्य आजही ताजी आहेत. पण आज जेव्हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले त्यावेळी शिवसेनेचा कोणताच नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.