सरकारी वकिलांचं कार्यालय म्हणजे मविआचा कत्तलखाना! देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांना संपवण्याचं प्रमुख जागा
मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सभागृहात महाविकास आघाडी सरकावर आरोपांची सरबत्ती लावली. सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोधकांवर खोट्या केस लावून त्यांना संपवण्याचा कट रचला जात होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांना महत्वाच्या केसेस या व्यक्तीला देण्यात आल्या. ही कथा इतकी मोठी आहे की यावर २५ ते ३० वेबसीरीज तयार होतील. हे कथानक सत्यघटनेवर आधारीत आहे यासंदर्भातला प्रत्येक व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये आहे असं फडणवीस यांनी म्हटलं.
विरोधकांना संपण्याची प्रमुख जागा
सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांना संपवण्याचं प्रमुख जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून, ड्रग्सचा धंदा कसा दाखवायचा, केस कशी करायची, कशीही करुन केस मोक्कामध्ये कशी फिट करायची, त्याचं नियोजन कसं करायचं, अशाप्रकारे गुन्हेगारीचा कट सरकारी वकिल रचतोय, पुढे त्यात पोलिसही आले आहेत. काही मंत्र्यांचाही सहभाग आहे.
या सर्वात एफआयआरही सरकारी वकिलांनी दिला. साक्षीदार सरकारी वकिलांनी तयार केले, घटनाक्रम कसे जोडायचे ते सरकारी वकिलांनी सांगितलं. जबान्या पाठ करुन घेतल्या, आणि आमचे एक माजी नेते जे आता तुमच्या पक्षात आहेत, त्यांनी ती व्यवस्था करुन दिली, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.
षडयंत्राचा सव्वाशे तासाचा व्हिडिओ
ही सगळी जी कथा आहे ती सर्व सरकारी वकिल आपल्या तोंडाने सागत आहेत या पेन ड्राईव्हमध्ये ते आहे. प्रत्येक घटनेचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. महाविकास आघाडीच्याच कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांच्या संदर्भातले खुलासे देखील त्याने केले आहेत. यासर्वांचं सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग आहे.
संजय पांडे यांच्या नियुक्ती मागे कट?
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.
फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे. साहेबांना या नेत्यांना संपवायचं आहे, असं संभाषण असलेले व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. आपला कट मार्गी लावण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना बसवण्यात आलं. मीडियाला कोणत्या बातम्या द्यायच्या, रेकी कशी करायची, यात अनिल गोटे आणि एकनाथ खडसे यांनी कशी महत्वाची भूमिका बजावली याचा संपूर्ण तपशील देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे.
अनिल देशमुखांनी कोट्यवधी कमावले
अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी. नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात. 2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही. एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही, असं संभाषण या व्हिडिओमध्ये असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.