`पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा`
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर 19 रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर 29 रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) ओबीसी राजकीय आरक्षणाची (OBC Political Reservation) हत्या केली असून ते परत मिळण्यासाठी लढा चालू ठेवा असेही ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यसमिती बैठक मुंबईत प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस समारोप करताना बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्यामुळे किंमतीत कपात झाली. परिणामी राज्यातील करामुळे मिळणारी रक्कमही आपोआप कमी झाली. तरीही हा दर आपणच कमी केल्याचं महाविकास आघाडीने सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महागाईवर बोलत असतात पण आता राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर दहा रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे, हे या नेत्यांनी सांगितलं पाहिजे. रा
ज्यातील पेट्रोल डिझेलची इंधनवाढ केवळ महाविकास आघाडी सरकारमुळे आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आंदोलन करून आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड करावा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ते परत कसे मिळवायचं याचा उपाय आपण मध्य प्रदेश सरकारला सांगितला. त्यानुसार त्यांनी डेटा गोळा करून कारवाई केली आणि त्या राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले. आपण हाच उपाय अनेकदा महाविकास आघाडी सरकारला सांगितला. पण त्यांनी त्यानुसार कारवाई केली नाही आणि ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळालं नाही. ओबीसींना आरक्षण मिळूच नये यासाठी कोणाचे तरी षडयंत्र दिसतं असा आरोपही फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारची आठ वर्षे ही नवभारताच्या निर्मितीची आठ वर्षे आहेत. त्यांनी देश हा एक कुटुंब मानून त्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. देश शक्तीशाली होण्यासाठी गरीबांना बळ दिले. मोदी सरकारचं काम भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेते जाऊन सांगावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विरोधी पक्षांच्या मनात सदैव अडानी अंबानी असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात मात्र सदैव गरीब, महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार असतो असं यावे ळी सी. टी. रवी म्हणाले. पंतप्रधानांनी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत आहे आणि मजबूत होत आहे. मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असून या सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.