महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा `राजकीय भूकंप`
राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारचा शपथविधी पार पडलाय
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर कधीही घडली नाही, अशी घटना आज अचानकपणे पाहायला मिळाली. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारचा शपथविधी पार पडलाय. सकाळी ८.०० वाजल्याच्या सुमारास भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायला मिळाले. त्यानंतर पाठोपाठ अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी, अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हेदेखील इथं उपस्थित दिसले. उल्लेखनीय म्हणजे, या शपथविधीची कानोकान खबर प्रसिद्धी माध्यमांनाही देण्यात आलेली नव्हती. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून अनेकांना धक्का बसला. अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठिंबा दिला याची खबर शरद पवारांना होती की नव्हती? त्यांचा या राजकीय खेळीला पाठिंबा होता की नव्हता? हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा मोठा गट फुटला का? त्यांना राष्ट्रवादीचे कोणकोणते आमदार पाठिंबा देणार, हे लवकरच समोर येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. खरंतर महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. परंतु, शिवसेनेनं इतर पक्षांसोबत जाण्याचा प्रयत्न केला. जे सरकार चालू शकत नाही असं सरकार देण्याचा प्रयत्न केला गेला. खरं वचन हे आम्ही जनतेला दिलं होतं... शिवसेनेकडून वचनाचा भंग झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताकरता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला' असं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. (मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)
यानंतर, राज्यपाल आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र देतील आणि त्यानंतर आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू, असं फडणवीस यांनी म्हटलंय. 'जनतेच्या हिताकरता हे सरकार चालेल... शेतकऱ्यांसाठी काम करू' असं आश्वासन देण्यासही ते विसरले नाहीत. (पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन)
NCP's Ajit Pawar takes oath as Deputy CM,oath was administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan pic.twitter.com/e1wVtiGZJX
उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गेला महिनाभर चर्चा सुरू होती. नको त्या गोष्टींची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे, आत्ताच जमत नसेल तर पुढे सरकार कसं चालेल? राज्याला स्थिर सरकारची गरज आहे, असं मला वाटलं त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलंय.