`त्यांनी आता जनाब बाळासाहेब स्वीकारले, अजानची स्पर्धा सुरू`; फडणवीसांचा सेनेला चिमटा
Devendra Fadnavis on MIM | महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्ष सामील होण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी `झी 24 तास` ने दाखवली होती. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
नागपूर : शिवसेनेने असंही आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब म्हटलं आहे, तर अजानच्यादेखील स्पर्धा सुरू आहेत. हे सर्व एकच आहे. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये एमआयएम (MIM) पक्ष सामील होण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी 'झी 24 तास' ने दाखवली होती. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
एमआयएमने जरूर महाविकास आघाडीसोबत(MVA) जावं, कारण ते सगळे एकच आहेत. भाजपच्या (BJP) पराभवासाठी हे सगळे प्रयत्न करीत आहेत. परंतू कितीही एकत्र आले तरी, महाराष्ट्रातील जनता मोदींजींच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएम सामील झाल्यानंतर शिवसेना काय करणार? याच्याकडे आमचं लक्ष आहे.
शिवसेनेनं (shivsena) याआधी एमआयएमवर टीका केली आहे. ते सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. शिवसेनेनं आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. आणि अजानचीही स्पर्धा सुरू आहे. त्याचाच हा परिणाम असावा. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
महाविकास आघाडीत MIM देखील सामील होणार?
राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.