मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांना विधीमंडळ नेतेपदी निवडावं असा प्रस्ताव मांडला. चंद्रकांत पाटील यांच्या या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १० आमदारांनी अनुमोदन दिलं. हरिभाऊ बागडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, सुनील देशमुख, देवराम होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आशिष शेलार यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणीही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही, महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चर्चा तर होत राहतील. या चर्चा होऊ द्या, त्याशिवाय मजा नाही, असं वक्तव्य विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेंचेही आभार मानले आहेत. तसंच मोदींमुळेच केंद्रात आणि राज्यात सरकार आल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 


आपलं सरकार आल्यावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबाबत निर्णय घेऊ. पुढच्या ५ वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


राज्यात गेल्या ५ वर्षांमध्ये कुठल्याच गटाने फडणवीस यांना बदला, अशी मागणी केली नाही. एकही गोळीबार झाला नाही, असं प्रस्ताव मांडताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 


विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकत भाजप हा सगळ्या मोठा पक्ष ठरला, तर शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४ जागा आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. तर इतरांना २९ जागा मिळाल्या. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राज्यामध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि समसमान मंत्रिपदाच्या वाटपाचा आग्रह धरला आहे. पण भाजप मात्र शिवसेनेची ही मागणी स्वीकारायला तयार नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्यामुळे भाजप-शिवसेनेची बैठकही रद्द झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी ५०-५० फॉर्म्युला मान्य केल्याची व्हिडिओ क्लिप राऊत यांनी दाखवली. भाजप आणि शिवसेनेमध्ये एवढा सत्तासंघर्ष सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र पुन्हा एकदा आपलंच सरकार येईल, असा विश्वास वर्तवला आहे.