छत्रपती संभाजीराजेंच्या `त्या` ट्विटनंतर फडणवीसांची दिलगिरी
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले.
मुंबई: छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. संभाजीराजे यांच्या या ट्विटला रिप्लाय देत देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे फडणवीसांनी आपल्या रिप्लायमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, माजी मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस माफी मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
काल म्हणजे ६ मे रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक 'कार्यकर्ते' असा केला होता. या आक्षेपार्ह उल्लेखामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते.