मुंबई: घरात देवेंद्रजी बॉस असले तरी निर्णय मात्र मीच घेते, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत मंगळवारी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' हा सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता रितेश देशमुख याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. तेव्हा अमृता फडणवीस यांनी खासगी आयुष्यातील अनेक मजेशीर अनुभव लोकांना सांगितले. यावेळी रितेश देशमुख याने अमृता फडणवीस यांना तुमच्या घरात कोणाचा शब्द चालतो, असा प्रश्न विचारला. त्यावर अमृता यांनी अत्यंत हुशारीने म्हटले की, घरात देवेंद्रजी बॉस आहेत पण डिसिजन मेकर मी आहे. त्यांच्या उत्तरानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना-भाजप यांची युती नेमकी कशी झाली, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, रश्मी वहिनींनी मातोश्रीवर दिलेले वडे आणि खिचडीमुळे युतीचा प्रश्न मार्गी लागला. युती झाल्यामुळे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते खूश आहेत. आम्ही झाले-गेले विसरुन एकत्र आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री कोणाचा हे आत्ताच सांगणार नाही. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.