मनेका गांधींनी जरा जास्तच टीका केली, पण.... - फडणवीस
मनेका गांधींनी महाराष्ट्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.
मुंबई: यवतमाळमध्ये टी १ वाघिणीला वनखात्याने ठार मारल्यानंतर भाजप सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीदेखील फडणवीस सरकारच्या कृतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. याप्रकरणी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचा इशारा त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला होता.
त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. तिच्या मृत्यूबद्दल शंका घेतल्या जात आहेत. मात्र, वाघिणीने हल्ला केल्यामुळे नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. मात्र, त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती, हेदेखील ध्यानात घेणे गरजेचे आहे. सध्या आम्ही याप्रकरणाची चौकशी करत असून टी १ वाघिणीला ठार मारताना नियमाचे उल्लंघन झाले का, हे तपासले जाईल.
मनेका गांधी यांनी यासंदर्भात खूपच तीव्र शब्दांत टीका केली होती. प्राण्यांबाबतचे काही प्रश्न असतील तर त्या अनेकदा पाठपुराव्यासाठी मला फोन करतात. त्या प्राणीप्रेमी असल्याने मी त्यांच्या भावना समजू शकतो, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली.