मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'धमकी कोण देत आहे, याची चौकशी झाली पाहिजे. ही लोकं खरी आहेत का खोटी आहेत, हे प्रकरण किती गंभीर आहे किंवा नाही, या सगळ्याची माहिती घेऊन कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत या सगळ्यांना चोख सुरक्षा पुरवली गेली पाहिजे', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यानंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईवरून धमकीचा फोन आला होता. मातोश्रीप्रमाणेच वर्षा बंगल्यावरही अशाप्रकारचा फोन आल्याचं सांगण्यात आलं आहे. 


उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवारांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा हा फोन आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर कंगना राणौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याचं बोललं जातंय. धमकीचे फोन आल्याप्रकरणी क्राईम ब्रांच तपास करत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.