मुंबई : राज्यातील विरोधी पक्ष रोज स्वत:चे हसे करुन घेत आहे. याची खूप दु:ख होत आहे. विरोधी पक्षाचे अध:पतन गेल्या ५० वर्षात झाले नव्हते ते विरोधी पक्षनेतेपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यापासून होत आहे. 'फ्री काश्मिर' पोस्टरवरुन काहीही माहिती न घेता टीका करणे सुरु केले आणि त्यांनी आपली विश्वासार्हता गमवाली आहे. ज्याला 'कौन्सिलिंग' म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे. कारण त्यांना रोज वाटत आहे, आज सरकार पडेल आणि आपण पुन्हा येऊ! मेहक प्रभू या मराठी मुलीने 'फ्री काश्मिर' असा फलक झळकवला. या फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार केला नाही. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. नंतर मेहक प्रभूने नेमके काय केले, ते स्पष्ट केल्यानंतर ते तोंडावर आपटले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'तून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वत:ची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हीला विरोधी पक्षाची काळजी वाटते, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झालेत. तेव्हापासून विरोधी पक्ष हा दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही. फडणवीस यांचे असे का झाले आहे, ते महाराष्ट्राला चांगले माहित आहे. राज्यात सत्तेत बसलेल्या सरकारवर ते रोज भंपक आणि बिनबुडाचा आरोप करतात आणि नंतर ते तोंडावर आपटतात, अशी टीका करण्यात आली आहे.


नागरिकता सुधारणा कायदा आणि 'जेएनयू'तील हल्ला प्रकरणानंतर देशातील तरुण वर्ग संतापला आहे. त्यामुळे तो रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन, धरणे वगैरे धरली. त्यात एका मुलीच्या हातात 'फ्री काश्मिर' असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावर विरोधी पक्षनेत्यांना धक्का बसला. त्यांच्यातील राष्ट्रभक्त उसळला आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला धारेवर धरले. काय तर म्हणे, पाहा, पाहा उद्धव ठाकरे यांच्या नाकासमोर काश्मिरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहे. हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?.. आदी. 


विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिशळण्यास इतर भगतगणही पुढे आलेत. पण त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच होता. ज्या मुलीने 'फ्री काश्मिर'चा फलक झळकवला ती मुलगीच तासाभरात मीडियासमोर आली आणि तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुस्लिम तसेच काश्मिरी नव्हती. ती मराठी मुलगी होती. मेहक प्रभू असे तिने आपले नाव सांगतिले. त्यानंतर भगतगण कोलमडले. 'फ्री काश्मिर' म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही. तर आज काश्मिरमध्ये नागरिकांवर निर्बंध, बंधने लादली आहे. त्यांना देशापासून तोडले गेले आहे. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. या जोकडातून त्यांना मुक्त करा, असा संदेश देण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, विरोधकांना राजकारण करायचे होते, असा टोला सामना अग्रलेखातून फडणवीस यांना लगावण्यात आला आहे.