मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षि शाहू महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल समस्त शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काहीवेळापूर्वीच यासंदर्भात एक ट्विट केले. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस माफी मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल म्हणजे ६ मे रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक 'कार्यकर्ते' असा केला होता. या आक्षेपार्ह उल्लेखामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. 

दरम्यान, या सगळ्या वादानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि सेलिब्रिटींना संभाजीराजे यांनी खडे बोल सुनावले होते. 


दरम्यान, या सगळ्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही फडणवीसांना चांगलेच सुनावले होते. तुम्ही राजर्षि शाहू महाराजांच्या स्मारकावर नाक घासून माफी मागा, असेही त्यांनी म्हटले होते.