देवेंद्र फडणवीस तुम्हाला `रॉ`मध्ये घेतले पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तुम्ही जे करत आहात ते सत्तेसाठी चालले आहे. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच कुटुंबीयांची बदनामी करू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. त्याचवेळी सारखे आरोप करुन ते खरं वाटायला लागलात टोला लगावत 'देवेंद्र फडणवीस तुम्हाला 'रॉ'मध्ये घेतले पाहिजे म्हणजे काम वेगान होईल, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देश मोदींविरोधात होता तेव्हा बाळासाहेबांनी साथ दिली होती. मर्द असाल तर समोर येऊन लढा, मग आम्ही बघू असे सांगत त्यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. मला खोटं बोलता येत नाही. राज्यपालांचे महत्त्व विरोधी पक्षांनाही माहीत आहे. हजारो किमी दूर आपण कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजन आणला. दाऊद एके दाऊद करत विंदांच्या कवितेप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी तुम्ही तेचं केलं. काही जणांचे मृतदेह नदीत सापडले आम्ही तसं काही केलं नाही. मुंबई पालिका शाळेत प्रवेशासाठी रांग लागते. कोरोना काळात राज्य सरकारने उत्तम कामं केलं, तुम्ही केवळ आरोप करत आहात. द्वेषाची काविळ झालेल्यांना आमच्याकडे उत्तर नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
नवाब मलिक चार-चार वेळा निवडून आले तेव्हा केंद्रातल्या यंत्रणा थाळ्या वाजवत होत्या का? असे सांगत मलिक यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना माहिती पुरवली. फडणवीस यांचे कौशल्य पाहता केंद्र सरकारने त्यांना रॉ किंवा सीबीआयमध्ये घेतले पाहिजे. जेणेकरून ही कामे अधिक वेगाने होतील, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.