चांगली कामं करणारी लोकं भाजपमध्येच असतात; फडणवीसांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून अभिनेता सोनू सूदवर करण्यात आलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगले काम करणारी लोकं भाजपमध्येच असतात, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
.. तर आपण देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल; मनसेचा राऊतांना खोचक टोला
मात्र, कोणीही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. सोनू सूद यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सांगतो की, सूद यांनी स्वत:च्या हिंमतीवर काम केले आहे. आम्ही जलयुक्त शिवारचे काम करायचो तेव्हा 'नाम' संस्था आणि आमीर खान हे पण काम करायचे. तेव्हा आम्ही हेवादावा केला नाही. उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल हे बघितले. कारण ते सरकारच्या कामात मदत करत होते. त्यामुळे सोनू सूद यांच्या कामाचे स्वागत झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.
सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत
यावेळी फडणवीस यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भातही भाष्य केले. कोकणातील चक्रीवादळचा फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पनवेल मधून मदत पाठवत आहोत. सरकारच्या कामात हातभार आम्ही लावत आहोत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली तोकडी आहे. लवकरच अधिकची मदत जाहीर केली पाहिजे. शरद पवार उद्या रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यानंतर ते परिस्थितीचे गांभीर्य समजून ते योग्य त्या सूचना सरकारला करतील अशी मला खात्री असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.