लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबीयांचा प्रवास, सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना
लॉकडाऊनमध्ये महाबळेश्वर प्रवास करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांची सीबीआय चौकशी करणार आहे. याचाच एक भाग म्हणून सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना झाले.
मुंबई : कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये महाबळेश्वर प्रवास करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांची सीबीआय चौकशी करणार आहे. याचाच एक भाग म्हणून सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना झाले तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी केली आहे. वाधवान कुटुंबीयांचा प्रवास आघाडी शासनाला आता तापदायक ठकरणार आहे, अशीच चिन्हे दिसत आहेत.
DHFL सह अन्य घोटाळ्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे पत्रच मीडियासमोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली आहे. तसेच विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे. त्याचवेळी राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनची अमलबजावणी कडक केली आहे. अशावेळी लोक घराबाहेर पडणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. त्यामुळे सगळीकडं शुकशुकाट असून, महामार्गावरून केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहनेच धावत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान हे कुटुंब आणि इतरांसह सुटीसाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतून महाबळेश्वरला केलेले वाधनवान कुटुंबीयांना पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पाचगणी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता सीबीआयचे पथकही महाबळेश्वरकडे रवाना झाले आहे. त्यामुळे सीबीआयकडून चौकशी होणार आहे. या चौकशीत काय माहिती पुढे येते याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.