मुंबई : राज्यात तेव्हा खळबळ उडाली जेव्हा एका महिलेने थेट राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन केलेल्या खुलाशानंतर आणखीच चर्चा सुरु झाल्या. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत. परळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मुंडे यांच्यावर आरोपानंतर आता भाजपकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे यांनी मात्र महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक विस्तृत फेसबुक पोस्ट लिहून यावर स्पष्टकरण दिलं आहे. शिवाय आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप ही त्यांनी त्या महिलेसह तिच्या बहिणीवर आणि भावावर केले आहेत. याबाबतचे आपल्याकडे पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.


दुसरीकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. 'धनंजय मुंडे हे जोपर्यंत सर्व आरोपातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही," असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.



भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.