मुंबई : हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा माजी स्वीय साहाय्यक आणि भाजप पदाधिकारी सचिन पवार याला अटक करण्यात आलीय. यामुळं भाजपच्या गोटात खळबळ माजलीय. दरम्यान, हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. उदानीची हत्या केल्याच्या आरोपावरून पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार याला अटक केलीय. त्यापाठोपाठ आता याप्रकरणी एका अभिनेत्रीची देखील चौकशी सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवोलिना भट्टाचार्य  असं या अभिनेत्रीचं नाव आहे. टीव्ही मालिकांमध्ये ती काम करते. उदानी यांच्या हत्येआधी त्यांनी आपल्या मोबाईलमधून जे फोन केले होते, त्यामध्ये देवोलिना भट्टाचार्य हिचा देखील मोबाईल नंबर होता. या दोघांमध्ये वारंवार संभाषण झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. एवढंच नव्हे तर मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील अनेक डान्सबार गर्लशी देखील त्यांचं बोलणं झालं होतं. त्यामुळंच याबाबतची चौकशी करण्यासाठी पंतनगर पोलिसांनी देवोलिनाला पोलीस ठाण्यात बोलावलंय. या चौकशीतून नेमकी काय माहिती हाती लागते, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.


राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत फोटोत सचिन पवार दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सचिन पवारला गजाआड केलंय. काही वर्षांआधी मेहता यांचा स्वीय साहाय्यक असलेला सचिन पवार घाटकोपरमधील राजकीय वर्तुळात भाजपचा युवा अध्यक्ष म्हणूनही परिचित आहे. भाजप नेत्यांबरोबर फोटोमधून झळकणाऱ्या सचिनची दुसरी बाजू उदानींच्या हत्येमुळं पुढं आलीय. 


घाटकोपरमध्ये राहणारे उदानी २८ नोव्हेंबरला गायब झाले. त्यांची कार पूर्व द्रुतगती महामार्गावर सापडली, पण उदानी यांचा काहीच सुगावा लागेना. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं माग काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उदानी दुसऱ्या कारनं नवी मुंबईकडे गेल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, ३ डिसेंबरला पनवेलजवळ खाडीतील झुडपात एक मृतदेह सापडला. या मृतदेहावरील कपड्यांवरून तो मृतदेह उदानींचाच असल्याचं ७ डिसेंबरला स्पष्ट झालं.


हिरे व्यापारी उदानी यांचं फोनवरून कुणाकुणाशी बोलणं झालं होतं याचा तपशील पोलिसांनी शोधला, तेव्हा आणखीच धक्कादायक माहिती समोर आली. मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील डान्सबारगर्ल्सशी त्यांचं बोलणं झालं होतं. टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या काही अभिनेत्रींशीही त्यांचं वारंवार संभाषण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यापैकी एक देवोलीना भट्टाचार्जी हिचा फोन नंबरही या तपशीलात समोर आला. 


पोलिसांचा हा तपास सुरु असताना भाजपचा पदाधिकारी सचिन पवार हा देखील उदानींचा मृतदेह सापडला, त्याच परिसरात असल्याचं मोबाईल तपशीलातून पुढे आलं. खुनानंतर तो नैनितालला पळून गेला होता. मग पोलीसही पवारच्या मागावर रवाना झाले आणि त्याला जेरबंदही केलं.


सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय साहाय्यक आणि भाजपचा पदाधिकारी असल्यानं त्याच्या अटकेनंतर सगळेच जण चक्रावून गेले. दरम्यान, आता तो आपला स्वीय साहाय्यक नसल्याचं सांगतानाच, भाजपात गुन्हेगारांना स्थान नाही, असं प्रकाश मेहतांनी स्पष्ट केलंय. पैशाच्या वादातून राजेश्वर उदानीची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पण या प्रकरणात बारगर्ल्स आणि टीव्ही अभिनेत्रींचीही चौकशी झाल्यानं या हत्येमागे आणखी काही कारणं आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान सचिन पवार हा भाजपची मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सचिव होता. त्याने ५ वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्याचा भाजपाशी काही संबंध नसल्याचं, भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितलं.