मुंबई : गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हटलंय संपादकीयमध्ये पाहा 


राज्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अपेक्षेप्रमाणेच प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, प्रतीकात्मक अंत्ययात्रा, पुतळ्यांचे दहन, सरकारच्या निषेधार्थ मुंडण, ‘जोडे मारा’ आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून झाला. मात्र हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या एकजुटीने फोल ठरवला आहे. सोमवारी याच वज्रमुठीचे तडाखे महाराष्ट्रात ठिकठिकाणी बसले. बहुतेक सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख बाजारपेठा, बाजार समित्या पाचव्या दिवशीही ओस पडलेल्या होत्या. नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, धाराशीव, लातूर, पुणे, धुळे, नंदूरबार आदी सर्वच जिल्हय़ांमध्ये ‘बंद’ कडकडीत आणि शंभर टक्के यशस्वी झाला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम वगैरे झाल्याने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. नाशिकमधील शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणून रस्ता रोखला, तर पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मालगाडी रोखून निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या संतापाचा हा उद्रेक सलग पाचव्या दिवशी महाराष्ट्राने पाहिला. अर्थात राज्य सरकारने तो पाहिला का? शेतकऱ्यांच्या निषेधाने सरकारच्या कानाचे पडदे फाटले का? बळीराजाच्या या संतापाची धग राज्यकर्त्यांना जाणवली का?.