मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजही कायम आहे. राजकीय पेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे अनेक महत्वाचे निर्णय होण्यास उशिर होत आहे. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात सत्तास्थापन करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, एक आठवडा झाला तरी सत्तास्थापन करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. मुंबईत चर्चा झाल्यानंतर आता दिल्लीत खलबते सुरु आहेत. केवळ चर्चेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे असताना शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.


पुढील ५- ६ दिवसात सरकार स्थापन होईल- संजय राऊत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा सुरुच आहे. अंतिम निर्णय दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर पुढे येण्याची शक्यता आहे. त्याआधी सोमवारी मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे सांगून धक्का दिला. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली होती. मात्र आता शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा दोन ते तीन दिवसांत संपेल, असे सांगत सत्तास्थापनेबाबतचे संकेत दिले आहेत.



दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज बैठक होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत न सुटल्याने नसल्याने आता सर्व राजकीय घडामोडी दिल्लीत घडत आहेत. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत होत आहे. त्यानंतर अधिक सत्तेस्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.


शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडून संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्तेचे घोडे अडलेले सध्यातरी दिसून येत आहे.


भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. वेळप्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.