दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकार (Central Government) राज्याला (Maharashtra Government) मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinate Meeting) झाली. केंद्र सरकारच्या या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा राज्य सरकारला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागलं. प्रत्येक नैसर्गिक संकटानंतर राज्यानं केंद्राकडे मदतीसाठी पॅकेजची मागणी केली. पण केंद्राकडून राज्याला निधी आला नसल्याचा राज्याचा आरोप आहे. निसर्ग चक्रीवादळासाठी राज्यानं केंद्राकडे १ हजार ६५ कोटींची मदत मागितली होती, मात्र केंद्रानं तुटपुंजी मदत दिली. 



पूर्व विदर्भातील आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी ८०१ कोटी मागितले. त्यासाठी दोन वेळा पाहणी पथक आलं. प्रस्ताव पाठवले पण मदत अद्याप मिळालेली नाही. अतिवृष्टी होऊन एक महिनाहून अधिक दिवस उलटले तरी केंद्राचं पथक आलं नाही. तसंच नुकसानीसाठी मदतही दिली नाही. केंद्राला मदतीबाबत पुन्हा एकदा पत्र पाठवण्याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.