Atal Setu : मुंबईकरांना नवी मुंबईतील उलवे किंवा पनवेल जाण्यासाठी साधारण दोन ते अडीच तास लागायचे आता हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर आला आहे. भारतातील सर्वात लांब सागरी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूला मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला आहे. 22 किलोमीटरचा हा सेतू 15 ते 20 मिनिटात पार करताना मुंबईकर गाडी चालवण्याचा आनंद घेताना दिसत आहे. अटल सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. तर या 10 दिवसांमध्ये 6 कोटी रुपये टोल वसुली करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू 13 जानेवारीपासून सकाळी 8 वाजेपासून मुंबईकरांसाठी खुला झाला. त्यानंतर या सेतूवरून आतापर्यंत 3 लाख 09 हजार 034 वाहनांनी प्रवास केलाय. तर या वाहनांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 6 कोटी 15 हजार 23 हजार रुपये टोल वसूल केला आहे. 


या सेतूवरून ताशी 100 किमी वेगाने गाड्यांना प्रवास करता येत असून नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे या ठिकाणी जाणे आता सोपे झाले आहे. दिवसाला सरासरी 23 हजार वाहने या सेतूवरुन प्रवास करता अशी माहिती देण्यात आली आहे. या सेतूवरून सर्वाधिक म्हणजे तब्बल 54 हजार 977 वाहनांनी 14 जानेवारीला प्रवास केला आहे. त्या एका दिवशी तब्बल 1 कोटी 6 लाख 24 हजार 570 रुपये टोल वसूल झाला आहे. तर 16 जानेवारीला 19 हजार 569 वाहनांनी या सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद लुटला. यादिवशी सर्वात कमी 37 लाख 94 हजार 245 रुपये इतका टोल जमा झाला. 


सागरी सेतूवर सुरक्षेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तुटलेली वाहने टोइंग करण्यासाठी स्वंतत्र आपत्कालीन मार्गिका, अँटी-क्रॅश बॅरियर्स असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक, मॉनिटरिंग सिस्टीमची व्यवस्था या सेतूवर करण्यात आली आहे. यासह पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ध्वनी अडथळे लावले आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्येही हा सेतू खंबर उभा राहणार आहे. सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक वस्तूंपासून तयार करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 10 देशांतील विषयतज्ज्ञ आणि सुमारे 15000 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम करुन मुंबईकरांना हा सेतू दिला आहे.