दिवाळीच्या तोंडावर खराब तूरडाळ, रेशन दुकानदारांकडून माथी
दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाचा उपक्रमातून रास्त धान्य दुनकानावर देण्यात आलेली तूरडाळ सडकी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात गतवर्षी तूरडाळीचे चांगले उत्पादन झाल्याने ही डाळ रेशन दुकानावर देण्यात आली. त्यावेळी डाळीचा दर्जा चांगला होता आणि दरही कमी होता. मात्र, आता देण्यात आलेली डाळही सडकी असल्याची माहिती पनवेल येथील स्थानिक ग्राहकांनी दिली आहे. तसेच ही डाळ घेतली नाही तर रेशन कार्ड रद्द करण्याची धमकीही दुकानदाराकडून देण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
राज्यात शासनाकडून रास्त धान्य दुकानांसाठी तूरडाळीचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, दिवाळीच्या तोंडावर खराब झालेली तूरडाळ का वितरीत करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपर्यंत ही तूरडाळ चांगल्या अवस्थेत होती. जून, जुलैमध्ये मिळालेली तूरडाळ चांगल्या प्रतीची होती. तसेच तूरडाळीचा दरही माफक होता. ३५ रुपये किलो दराने रेशनवर तूरडाळ मिळत होती. आता दिवाळीच्या तोंडावर खराब तूरडाळ का देण्यात आली आहे. तसेच या तूरडाळीचा भाव चढा आहे. ५५ रुपयांना खराब तूरडाळ का उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
अनेक रास्तधान्य दुकानदार ग्राहकांना ही खराब तूरडाळ माथी मारत आहेत. जर तुम्ही ही तूरडाळ घेतली नाही तर तुमचे रेशनकार्ड रद्द केले जाईल, अशी धमकी दिली जात आहेत. काही लोकांना भीतीपोटी ही सडकी तूरडाळ ५५ रुपये देऊन खरेदीही केली आहे. कारण आपले रेशनकार्ड रस्त होऊ नये म्हणून. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभारामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने १८००२२४९५० हा कस्टमर केअर नंबर दिला आहे. मात्र, हा दूरध्वीन बंदच आहे. लाईन खराब असल्याने आपला कॉल पूर्ण होऊ शकत नाही, अशी टेप वाजवली जात आहे. त्यामुळे हा नंबर देण्याचा केवळ दिखावा केला आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.