दीपक भातुसे / मुंबई :  राज्यातील काही जिल्हे विमानसेवेने जोडण्याची महाराष्ट्राची संधी गुजरातने हुसकावून घेतली आहे. स्वस्तात विमानप्रवासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण ही योजना जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजने अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, नांदेड हे जिल्हे विमानसेवेने मुंबईशी जोडले जाणार होते. मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असल्याने उडाण योजनेंतर्गत सेवेसाठी मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यासाठी आणि उड्डाणासाठी आठा वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र या आठ वेळांपैकी सहा वेळा गुजरातने पळवल्या आहेत. त्यानुसार आता गुजरातमधील कांडला, पोरबंदर आणि सुरत ही शहरे उडाण योजने अंतर्गत स्वस्त विमानसेवेने मुंबईशी जोडली जाणार आहेत. 


आता मुंबई विमानतळावर विमान उड्डाण आणि विमान उतरवण्यासाठी वेळेची उपलब्धता नसल्याने राज्यातील चार जिल्हे मुंबईशी स्वस्त विमानसेवेने जोडले जाण्याची योजना बारगळण्याची चिन्हं आहेत. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन हे जीव्हीके या खाजगी कंपनीकडे आहे. विमानतळावरील या आठ वेळा मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले नाहीत. 


तर दुसरीकडे गुजरात सरकारने जीव्हीकेकडे पाठपुरावा करून आठ वेळांपैकी सहा वेळा मिळवल्या आहेत. त्यामुळे गुजरातमधील तीन शहरे आता स्वस्त हवाई सेवेने मुंबईशी जोडली जाणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दोनच वेळा आल्यामुळे राज्यातील चार जिल्ह्यांची स्वस्त विमानसेवा सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.