परिवहनमंत्र्यांकडून मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवणाऱ्या चालकाच्या बडतर्फीचे आदेश
संबंधित बसच्या वाहकाच्या व प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने दुर्घटना टळली.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मद्यधुंद अवस्थेमध्ये एसटी बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मुजोर चालकाची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार एसटीच्या सेवेतून हकालपट्टी करण्यात आली.
यापुढे देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशा कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत. जेणेकरून भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणार्यांना कायमचा आळा बसेल.
२५ जुलै रोजी पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे सदर बस चालवून अपघात घडवला. संबंधित बसच्या वाहकाच्या व प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने दुर्घटना टळली. परंतु सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याचे विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याची सूचना निर्गमित केली आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकावर कडक कारवाई करून निर्भयपणे काम करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना धीर दिला. त्याचप्रमाणे या कारवाईमुळे प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्दिष्टाला एसटीकडून कधीही गालबोट लागणार नाही, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल असे रावते यांनी सांगितले.