बाजारपेठांमध्ये दिवाळीची धूम
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येतेय
दिपाली पाटील, मुंबई : देशभरात सध्या सर्वत्र दिवाळीची धूम पहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येतेय. बाजारपेठा सध्या विविध रंगांनी नटल्या असून ग्राहकांना आकर्षित करताहेत.
दिवाळी म्हटलं की पणत्या, रांगोळी, कृत्रिम लायटींग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडते. यंदाही हेच चित्र दिसत असून यंदा काही नवीन बाजारात आलय का? यासाठी विशेषत: महिला वर्ग उत्सूक असतो.
रेडीमेड रांगोळीचा साचा वापरण्याची मोठी क्रेझ सध्या आहे. त्यामुळे विविध डिझाईन्समध्ये रांगोळीचे साचे बाजारात उपलब्ध आहेत. रांगोळीतही अनेक रंग नव्याने आलेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईन्समधील कँडल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत.
नोकरदार महिला वर्ग मोठ्या संख्येनं असल्यानं रेडीमेड फराळ खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडालीय. तर लायटींगमध्ये चायनीज मालाला पर्याय नसून नाईलाजास्तव ग्राहकांनी चायनीज लायटींगच खरेदी करावी लागतेय.
जीएसटी लागू केल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे बाजारात अनेक साहित्यांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी हौसेला मोल नसतं असं म्हणतात त्यात दिवाळीसारखा मोठा सण यामुळे ग्राहक किंमत जास्त असली तरी वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.