स्टीलच्या ग्लासाखाली फटाके फोडणं 10 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतलं; ग्लासाचे तुकडे झाले अन्...
Diwali Celebration Went Wrong: मुंबईमध्ये फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्याही अधिक आहे. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.
Diwali Celebration Went Wrong: दिवाळी देशभरामध्ये सर्वच ठिकाणी उत्साहात पार पडली. अनेक राज्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटक्यांची आतीशबाजी करुन उत्साह साजरा करण्यात आला. मात्र फटाके फोडताना काही विचित्र दुर्घटनांमध्ये नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईमध्ये दिवाळीच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये फटका फोडताना 49 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका 10 वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना प्राण गमावलेत. फटाके फोडताना झालेल्या अगदीच विचित्र अपघातात या मुलाने प्राण गमावला.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे फटाके फोडताना प्राण गमावलेल्या मुलाचं नाव आर्यन चक्रबर्ती असं आहे. फटक्यावर स्टीलचं ग्लास ठेवून फोडताना या ग्लासचा एक तुकडा उडाला आणि या मुलाचा गळा चिरला गेला. फटाके फोडताना काहीतरी वेगळं करुयात असा विचार करुन काही मुलांनी फटाक्यावर वेगवेगळ्या वस्तू ठेवून ते फोडत असतानाच हा अपघात घडला ज्यात आर्यन गंभीर जखमी झाला. आर्यनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अती रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये जाणूनबुजून आर्यनचा गळा चिरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र पोलीस तपासामध्ये हा संपूर्ण प्रकार अपघातच असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबईतही जखमींची संख्या मोठी
मुंबईमध्येही फटाक्यांमुळे जखमी झालेल्यांची संख्या अवघ्या चार दिवसांमध्ये 49 वर पोहचली आहे. मुंबईत सालाबादप्रमाणे यंदाही फुलबाजे, भुईचक्र, सुतळी बार, रॉकेट असे विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले. हे फटाके फोडताना मुंबईमध्ये विविध ठिकाणी जवळपास 49 जण जखमी झाले आहेत. यापैकी 16 रुग्णांवर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले असून ज्यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. शीव म्हणजेच सायनमधील रुग्णालयात 12 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयात 9 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कूपर रुग्णालयामध्ये 2 रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णलयांच्या प्रमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली. जे. जे. रुग्णालयामध्ये 4 जणांवर उपचार करण्यात आले. जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिघांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तिघेही किरकोळ जखमी झाले होते. त्याचप्रमाणे फटाके फोडताना जखमी झाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तीन जण उपचारासाठी दाखल झाले होते. या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
सहा जण रुग्णालयात दाखल
मुंबईत जखमी झालेल्यांपैकी सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे. या दुर्घटनांमध्ये जखमी झालेले बहुतांश रुग्ण हे भाजले आहेत.