दिवाळीच्या गर्दीने एसटी आगार पुन्हा गजबजले
संप मिटल्यामुळे राज्यभरातल्या एसटी आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली पाहायला मिळाली.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप, अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासूनचा प्रवाशांचा मनःस्ताप अखेर संपुष्टात आला आहे. संप मिटल्यामुळे राज्यभरातल्या एसटी आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली पाहायला मिळाली.
भाऊबीजेचा दिवस आणि संप मिटला
ऐन भाऊबीजेचा दिवस असल्यानं, नागरिकांना आपल्या इच्छीत स्थळी जाता आलं. संपामुळे चार दिवस शुकशुकाट असलेल्या विविध एसटी आगारांमध्ये, आता नेहमीचीच लगबग आणि वर्दळ दिसून आली.
एसटी आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी
विशेष म्हणजे संपामुळे विविध एसटी आगारांत ठिय्या देऊन बसलेले कर्मचारी, तसंच संपामुळे एसटी आगारांत राहिलेले एसटी चालक वाहकही आपापल्या ठिकाणी परतले.