मुंबई : आजवर तुम्ही माणसाचं एमआरआय स्कॅन झाल्याचं ऐकलं असेल. मात्र मुंबईतील चेंबूरमध्ये एमआरआय स्कॅन करुन एका सापाला जीवदान देण्यात यश आलंय. दहिसर इथू सर्पमित्र वैभव पाटील यांनी बांबू पिट जातीच्या विषारी सापाला पकडले. मात्र तो साप जखमी असल्याचे त्यांना आढळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा साप फक्त पुढच्या बाजूची हालचाल करत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी या सापाला उपचारासाठी चेंबूर इथल्या डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर दीपा कट्याल यांनी तातडीने औषधोपचार करत सापाला कुठे मार लागला हे पाहण्यासाठी एक्स-रे काढला. मात्र त्यातून काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे सापाचा एमआरआय स्कॅन काढण्याचं निश्चित झालं. 


मात्र या विषारी सापाला कोण पकडणार, एमआरआय कसा काढायचा याबाबत अनेक शंका होत्या. अखेर कट्याल यांच्या परिचयातील व्यक्तीच्या मदतीने सापाचा एमआरआय काढण्यात आला. यातून सापाला कुठे मार लागला हे समजलं आणि त्यानुसार उपचार करुन सापाला जीवदान देण्यात आलं. विशेष म्हणजे यासाठी डॉक्टर कट्याल यांनी कोणताही मोबदला घेतला नाही.