आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करुनही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच डोंबिवलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चोरट्यांना हा प्रयत्न फसला आहे. मात्र चोरट्यांच्या एका चुकीमुळे एटीएममधील 21 लाखांची रोकड जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीतील गरीबाचापाडा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. गरीबाचापाडा इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करुन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गॅस कटर वापरल्याने एटीएममधील 21 लाखांची रोकड जळून खाक झाली. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागलं आहे. शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी चोरट्यांनी थेट एटीएममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच विष्णुनगर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस सिलिंडर आणला होताा. तो गॅस सिलिंडरसुद्धा चोरटे त्याच ठिकाणी टाकून पळून गेले आहेत. चोरट्यांनी डीव्हीआर देखील पळवल्याने त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. 


धक्का लागला म्हणून थेट केला गोळीबार


डोबिंवलीमध्ये चार दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरुन गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला होता. डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील एका बारमध्ये ही घटना घडली. रात्री दीडच्या सुमारास हा गोळीबार झाला होता. या गोळीबारात एक जण जखमी देखील झाला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.


डोंबिवली मानपाडा परिसरात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सेवन स्टार नामक लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये धक्का लागल्याचा वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत विकास भंडारी नावाच एक तरुण जखमी झाला होता. त्याच्यावर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.