ऐका हो ऐका! रक्तदान करा आणि मिळवा १ किलो चिकन
शिवसेनेची अजब ऑफर...
मुंबई : एकिकडे राज्यात coronavirus कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झालेले असतानाच आता राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. अवघे काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्यामुळं विविध राजकीय नेतेमंडळी आणि पक्षांकडून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिरांच्या याच वातावरणात चर्चा सुरु आहे ती म्हणजे 13 डिसेंबरला प्रभादेवी येथे पार पडणाऱ्या महारक्तदान शिबिराची. शिवसेना समाधान सरवणकर यांनी नागरिकांना लक्षवेधी ऑफरच दिली आहे.
शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचं जाहीर करत जनतेला मदतीची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर समाधान सरवणकर यांनी एक नामी शक्कल शोधली.
रक्तदान करा आणि मांसाहारींनी एक किलो चिकन न्या, तर शाकाहारींनी पनीर अशी ही जाहीर ऑफरच त्यांनी नागरिकांना दिली. नागरिकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरात सहभागी होत राज्यातील ही रक्तटंचाई दूर करावी असं आवाहन खुद्द समाधान सरवणकर यांनी केलं आहे.
सरवणकरांनी केलेलं हे आवाहन स्वीकारत आता जनता या रक्तदान शिबिराला नेमका कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑफर कशाचीही असो, सरतेशेवटी रक्तदान हेच महादान ही बाब मात्र विसरुन चालणार नाही.