मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. अशा परिस्थीतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला. त्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. 'राज्यात रूग्णवाढ किंचीत थांबली आहे. पण गाफीलपणा बिलकूल परवडणार नाही. काही जिल्ह्यांमध्ये रूग्णवाढ होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण संख्या मंदावत आहे. आपली दुसऱ्या लाटेसोबत लढण्याची तयारी आहे.' असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय त्यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता असताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री म्हणाले, 'देशामध्ये तिसरी लाट येत आहे सावध राहा. 25 एप्रिल 6 लाख 98 हजार रूग्ण होते , मे महिन्यात 6 लाख 41 हजार नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली. रूग्ण संख्या कमी झाली तरी नियम पाळणं बंधनकारक आहे. राज्यात आरोग्य व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत लसी उपलब्ध होतील.  '


'राज्य रोज 1200 मे. टन ऑक्सिजनचं उत्पादन करतं. आता  3  हजार मे.टन पर्यंत नेण्याची तयारी आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण होईल. राज्यात रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे . ती देखील आवश्यकतेनुसार भरून निघेल.' असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय त्यांनी फॅमिली डॉक्टरांसोबत देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केली. 


'शहरांमधील , वस्त्यांमधील डॉक्टरांसोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणं सोपं होणार आहे. कोणत्या रूग्णाला रूग्णालयात दाखल करायचं. कोणती औषधं द्यायची कोणती नाही.' याबद्दल सविस्तर चर्चा झाल्याचं  देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.