दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. या कार्यक्रमाला केवळ १६ जणच निमंत्रित होते कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे नमूद करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती. मात्र, शरद पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना आज सकाळी निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती.


यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, निमंत्रण कोणाला द्यायचं, कुणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी दोन पक्षांशी माझे सख्य नाही. मात्र, मुख्यमंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.