`तुम रिझर्व कॅटेगरीसे हो ना? तुम्हे नीट मे कौनसा रँक मिला?`
सुसाईड नोटचा वारंवार उल्लेख होत असला तरी प्रत्यक्षात त्यासंबंधी कोणतीही माहिती पोलिसांनी सादर केलेली नाही
दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टर आरोपींना येत्या १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात तपास गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आला असून, ठोस पुरावे शोधण्याचं आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीसाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सत्र न्यायालयाकडं आणखी सात दिवसांची मुदत मागितलीय. या सात दिवसांत नायर रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, शिपाई यांची चौकशी होऊ शकते. कारण पायलची आई तसंच सहकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नायर रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचा उल्लेख केलाय. पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या चौकशीची माहिती शुक्रवारी सत्र न्यायालयात दिली. त्यानुसार, डॉ. पायल तडवी हिला किरकोळ कारणावरून, जातीवाचक शब्द वापरून तीनही आरोपींकडून अपमानित केलं जातं होतं, असा जबाब पायलची सहकारी स्नेहल शिंदे हिनं दिलाय.
पायल तडवीनं सुसाईड नोट लिहिली होती?
'तुम रिझर्व कॅटेगरीसे हो ना? तुम्हे नीट मे कौनसा रँक मिला? असा सवाल अटकेत असलेली आरोपी डॉ. हेमा आहुजा हिनं विचारला होता. त्यावर 'मुझे मेरे बॅच में फर्स्ट रँक मिला था' असं उत्तर पायलनं दिल्याचं स्नेहल शिंदेंनं पोलिसांना सांगितलं. २२ मे रोजी ज्यादिवशी पायल तडवीनं आत्महत्या केली. त्यादिवशी ती दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत हॉस्टेल रूममध्येच होती. तिनं लिहिलेली सुसाईड नोट आरोपींनी लंपास केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलंय.
'सहन तर करावं लागणारच'
१३ मे रोजी पायलची आई नायर रुग्णालयाच्या डिनकडे गेली होती. मात्र शिपायानं भेटू दिलं नाही, अशी माहिती पुढं आलीय. डॉ. पायल तडवी यांचे लेक्चरर डॉ. चींग पींग यांच्याकडेही पायलच्या आईनं तक्रार केली होती. त्यावर तुम्ही पायलला समजून सांगा, असं डॉ. चींग पींग यांनी तिच्या आईलाच सांगितलं. त्यानंतर डॉ. चींग पींग यांनी पायल आणि आरोपींना केबीनमध्ये बोलवून घेतलं. पायलला सर्व काही सहन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं.
२२ मे रोजी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी दुपारी पायलच्या आईनं तिला फोन केला होता. डॉ. चींग पींग यांच्याकडं केलेल्या तक्रारीनंतर तिचं रॅगिंग होतंय, तिला त्रास दिला जातोय, ओटी रूममध्ये प्रॅक्टिस करू देणार नाही, असं धमकावलं जातंय, असं पायलनं आईला सांगितलं. त्यानंतर रात्री ९ नंतर पायलनं फोन उचलला नाही.
पुराव्यांचं आव्हानं
पायल तडवी हिनं अनुसुचीत जाती कोट्यातून प्रवेश घेतल्यानं तिला आरोपींकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्या त्रासामुळंच पायलनं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलंय. याप्रकरणी आता गुन्हे शाखेला पायलची सुसाईड नोट, साक्षीदारांचे आणि सहकाऱ्यांचे जबाब, वॉट्सअॅप चॅट असे अनेक पुरावे गोळा करावे लागणार आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या पोलीस तपासणीत अद्यापही पोलिसांच्या हातात ठोस पुरावा लागलेला नाही. रुग्णालयातून पायलच्या बाजूने एकच साक्ष मिळाली असून ती टिकवून ठेवण्याचे आव्हानही आहे. सुसाईड नोटचा वारंवार उल्लेख होत असला तरी प्रत्यक्षात त्यासंबंधी कोणतीही माहिती पोलिसांनी सादर केलेली नाही. हत्या की आत्महत्या याबाबतही पूरावा नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात मान्य केले. त्यामुळे पुढील काही दिवसात पोलिसांच्या हाती पूरावे लागतात यावर पूर्ण प्रकरण अवसंबून आहे.