मुंबई : एका अंध व्यक्तीला दृष्टी दिल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेल...मात्र एका तळ्यातील अंध बदकाला दृष्टी दिल्याचं ऐकलंय? मात्र ही किमया करून दाखवलीये मुंबईतील प्रसिद्ध नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी. आतापर्यंत अनेकांना दृष्टी मिळवून देणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. रुग्णालयाच्या आवारातील तळ्यातील एका बदकाला दृष्टी मिळवून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे.जे.तील नेत्रचिकित्सा विभागाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या कौशल्यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या आवारातील तळ्यातील एका बदकालाही दृष्टिलाभ झाला. 


डॉ. लहाने यांनीच जोपासलेल्या बागेतील तळ्यातील एका बदकाला दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले. आता ते बदक अन्य बदकांबरोबर बागेत मुक्त विहार करत आहे. जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागालगत असलेल्या मोकळ्या जागेत डॉ. लहाने यांनी बाग तयार केलीये. यासोबतच तिथे एक तळंही बनवलंय.


या तळ्यात बदकंही आहेत. यातील एका बदक तळ्यात आल्यानंतर तिथून बाहेर पडण्याऐवजी तेथेच गिरक्या घेत बसायचं. त्याचप्रमाणे बाहेर पडल्यावर पिंजऱ्यात जाताना त्याची होत असलेली धडपड पाहून त्याची दृष्टी गेली असावी, अशी शंका विद्यमान विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख यांना आली.


डॉ. रागिणी यांनी ही गोष्ट डॉ. लहाने यांना सांगितली. या दोघांनीही बदकाच्या डोळ्यांची तपासणी केली. तपासणीनंतर या बदकाला डोळ्यांचा अल्सर झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर डॉ. लहाने  यांनी उपचाराबाबतची आवश्यक माहिती घेऊन त्याच्या डोळ्यांत औषधाचे थेंब टाकण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम काही दिवसांतच दिसून आला.


डॉ. लहाने यांच्या सांगण्यानुसार, "अजूनही या बदकाच्या डोळयांत टिका असल्यामुळे त्याला थोडं तिरकं दिसण्याची शक्यता आहे. मात्र, आता ते छोटय़ाशा तळ्यात छान मस्ती करतंय."


जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागालगत असलेल्या मोकळ्या जागेत जेथे एकेकाळी कचरा टाकला जायचा तिथे त्यांनी सूर्यफुलाच्या शेतीपासून गुलाबाचं ताटवं फुलविण्यापर्यंत अनेक प्रयोग केले. अलीकडेच या जागेत त्यांनी एक सुंदर बाग तयार केली असून याठिकाणी अनेक दुर्मीळ पक्षी तसंच मुंबईतून अदृश्य होत असलेल्या रंगीत चिमण्या मुक्तसंचार करतात.