युट्यूबच्या माध्यमातून अंमली पदार्थ तस्करी, पोलिसही चक्रावले
हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराला अटक झाल्यावर आता युट्यूबच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा खुलासा झालाय.
अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराला अटक झाल्यावर आता युट्यूबच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा खुलासा झालाय.
बकुळ चंदेरिया असं या हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराचं नाव आहे. युट्यूबवरची त्याची अंमली पदार्थांची तस्करी पाहून मुंबई पोलीसही चक्रावलेत. बकूळचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलंय. आता राजकीय नेते, उद्योगपती आणि बड्या अधिका-यांच्या मुलांनाही बकूळ अंमली पदार्थ पुरवायचा असा संशय आहे.
सांकेतिक भाषेचा वापर
अंमली पदार्थाच्या रेव्हपार्टीसाठी सोशल मीडियावरुन सांकेतिक शब्दांचा किंवा चित्रांचा वापर करुन रेव्ह पार्टीचं निमंत्रण दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण सांकेतिक शब्दांचा आणि चित्रांचा वापर करुन अंमली पदार्थ सोशल मीडियावर विकले जातात यावर तुमचा विश्वास बसणार नाही.. लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा ही नावं ऐकून किंवा यांचे चित्र पाहून ही अंमली पदार्थांची नावं असतील याचा तुम्ही विचार देखील कधी केला नसेल.
रातराणी या सांकेतिक शब्दाचा वापर
एसएसडी डॉट या अंमली पदार्थाची युट्युबवर तस्करी करण्यासाठी लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा हे सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरली जातात. कोकेन या अंमली पदार्थाकरता ओजो किंवा व्हाईट हा सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरली जातात. एमडी या अंमली पदार्थासाठी रातराणी या सांकेतिक शब्दाचा किंवा चित्राचा वापर केला जातो. कॅनाबीससाठी हर्बलवीड म्हणजे आयुर्वेदिक औषध आणि हशीशसाठी हॅशटॅग हे सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरले जातात.
ट्रान्स म्युजिकचे व्हिडिओ
सांकेतिक शब्द वापरुन युट्यूबवर सर्च केल्यास ते शब्द हॅशटॅग म्हणून वापरलेले ट्रान्स म्युजिकचे व्हिडिओ सर्च रिझल्ट म्हणून येतात. तेथे कमेंटमध्ये चॅट करुन अंमली पदार्थ विकले जातात. ही माहिती मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या बकुल चंदेरीया नावाच्या एका हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराकडून समोर आलीये.
बकुलची हायप्रोफाईल तस्कर म्हणून ओळख
हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कर म्हणुन हा बकुल चंदेरीया कुप्रसिद्ध आहे. बॅलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते, अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने बकुलची हायप्रोफाईल तस्कर म्हणुन ओळख आहे. तर, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नामी शक्कल काढून अंमली पदार्थांची तस्करी करतो म्हणून चालाख तस्कर ही दुसरी ओळख. बकुलला अनेकदा अटकही झालीये पण तो त्याचे हायप्रोफाईल वजन वापरुन बाहेर यायचा. यंदा मात्र बिहारचे सिंघम उपाधी असलेल्या आयपीएस शिवदीप लांडे यांच्या तावडीत हा सापडलाय.
याआधीही बकुलला अटक
याआधी जुहू इथल्या ओखवूड ड्रग्स पार्टी प्रकरणीही पोलिसांनी बकुल चंदेरीयाला अटक केली होती. गेल्या महिन्याभरापासून अंमली पदार्थ विरोधी पथक बकुलच्या मागावर होते. अखेर बकूलला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.