Drug Party : नवाब मलिक यांनी NCB ने सोडून दिलेल्यांची नावे केली जाहीर, केली ही मागणी
Nawab Malik on Drug Party : ड्रग्ज पार्टीतून (drug party) एनसीबीने (NCB) 10 लोकांना पकडले होते. त्यातील काहींना सोडले. यांची नावे नवाब मलिक यांनी जाहीर केली.
मुंबई : Nawab Malik on Drug Party : ड्रग्ज पार्टीतून (drug party) एनसीबीने (NCB) 10 लोकांना पकडले होते. त्यातील काहींना सोडले. यात भाजपच्या (BJP) नेत्याचा मेहुणा होता, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यांनी NCBवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी व्हिडिओ सादर करून भाजपवर हल्ला चढवला आहे. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांचे दिल्लीत कोणाशी संबंध आहेत, अशी थेट विचारणा नवाब मलिक केली आहे.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील दोन लोकांनी आमंत्रित केले होते. ज्यांना नंतर अटकेनंतर सोडण्यात आले. आर्यन खानला फ्रेम करण्यासाठी ही पूर्वनियोजित रणनीती होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्याचवेळी भाजप त्यांच्या स्वतःच्या अजेंड्यासाठी NCB चा वापर करत आहे आणि संपूर्ण कट महाराष्ट्र सरकार आणि बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी आहे, असे ते म्हणाले.
किरण गोसावी जो व्यक्ती पंचनामा करताना तेथे होता, तो अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. तो गुन्हेगारी आरोप असलेला व्यक्ती सरकारी कारवाईचा भाग कसा बनू शकतो, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. आम्ही रिषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या कॉल रेकॉर्डची मागणी करत आहोत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या ताबडतोब सुटकेच्या मागे कोण होते, ते जाहीर करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
रिषभ सचदेव हा भारतीय युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याचा दावा मलिक यांनी यावेळी केला आहे. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा डाव आहे, या डावामध्ये भाजपचा सहभाग असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.