मुंबई : विरार पूर्वेकडील शिरसाड अंबाडी रोडवर डंपर आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात खासगी बस मधील १५ प्रवाशी जखमी झाले असून २ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज, बुधवारी सकाळी ९च्या सुमारास डंपर अंबाडीच्या दिशेने भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना, हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डंपर भरधाव वेगाने ओव्हरटेक करत जात असताना, दुसरीकडे गणेशपुरीकडून वसईच्या वालीव येथील कामगारांना घेवून बस निघाली होती. त्यावेळी चांदीप - पारोळ दरम्यान डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून १५ प्रवाशी किरकोळ जखमी झालेत. दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ मार लागला असून सर्व प्रवाशांना हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 



विशेष म्हणजे अनेक रुग्णवाहिकांना फोन करुन सुद्धा एकही रुग्णवाहिका आली नाही. स्थानिक रिक्षा आणि खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. मात्र विरार पोलिसांनी क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली.