मुंबई : मुंबईमध्ये पोटच्या एकुलत्या एक मुलाने आईला घराबाहेर काढल्यानंतर बेघर आजींच्या मदतीसाठी खाकी वर्दीमधील पोलीस धावून आले. विलेपार्लेत राहणाऱ्या 62 वर्षीय महिलेला मुलाने कोरोना काळात घराबाहेर काढल्याने ती रस्त्यावर आली. तिने अनेकांची मदत मागितली पण कुणीही मदतीसाठी आलं नाही. अखेर आजीनं विलेपार्ले पोलीस स्टेशन गाठलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 62 वर्षांच्या आजींनी पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलाचा सांभाळ करण्यासाठी धुणीभांडी केली. मुलाला चांगलं शिक्षण दिलं. मुलाला काहीही कमी पडू दिलं नाही. आपल्या उतारवयात मुलगाच आपली काळजी घेईल अशी भोळी आशा ही माऊली बाळगून होती. पण मुलाने रंग दाखवले. कोरोना काळात मुलाने आपल्या वृद्ध आईलाचा सांभाळ करण्यास नकार देत तिला घराबाहेर हकललं.  


बेसहारा झालेल्या आजींनी ज्यांच्याकडे तीने धुणीभांडी केली त्यांच्याकडे मदत मागितली. पण कुणीच मदत केली नाही. अखेर आजींनी विलेपार्ले पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली व्यथा मांडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वृद्धाश्रमातही त्यांना जागा मिळत नव्हती. अखेर पोलीसच आजींचा मदतीला धावून आले. पोलीस स्थानकात आजीच्या राहण्याची सोय करण्यात आली. पोलिसांनी तब्बल दीड महिना आजीचा सांभाळ केला.


दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी मावळ तालुक्यातील कुसवली इथल्या सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्याशी संपर्क साधून पुढील आयुष्याची सोय होण्यासाठी आजींची शिफारस केली. कोरोना लसीकरणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रमोद थोरात यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला सोबत घेऊन आजींना सहारा परिवारात दाखल केलं.