ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा, जुने नेते कोणाच्या मेळाव्याला?
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची कोंडी, कुणाच्या मेळाव्याला उपस्थित रहाणार?
Dussehra Melava 2022 : दरवर्षी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणारा दसरा मेळावा (Dussehra Melava), ही शिवसेनेची (Shivsena) खास परंपरा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं (Balasaheb Thackeray) भाषण आणि नेत्यांची व्यासपीठावरची उपस्थिती, हे या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य. पण आता चित्र बदललंय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना नेत्यांचीही विभागणी झालीय. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासारखे नेते शिंदे गटात सामील झालेत.
तर सध्या शिवसेनेत काहीसे मागे पडलेल्या ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) भेट घेतली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi), माजी मंत्री लिलाधर डाके (Leeladhar Dake) आणि शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) हे पुन्हा चर्चेत आले. हे नेते आता कुणाच्या मेळाव्याला उपस्थित राहतात, याची उत्सूकता आहे.
जुने नेते कोणाच्या मेळाव्याला?
गोरेगावात झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात लीलाधर डाके आणि गजानन कीर्तीकर हे दोघेजण उपस्थित राहिले होते. तर प्रकृतीचं कारण देत मनोहर जोशी गैरहजर होते. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर झालेल्या एका दसरा मेळाव्यात मनोहर जोशींच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. त्यांना स्टेजवरून खाली उतरावं लागलं होतं. त्यामुळं आता मनोहर जोशी काय भूमिका घेतायत, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
ठाकरे आणि शिंदेंनी आपापसातले वाद मिटवावेत आणि पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू नये, असा सल्ला गजानन कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंच्या गोरेगावच्या मेळाव्यादरम्यान दिला होता. मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. दोन मैदानात होणारे दोन वेगवेगळे मेळावे, हे त्याचंच लक्षण. ठाकरे-शिंदे वादात इतर शिवसेना नेते मात्र भरडले जातायत.