दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघाच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी एका टेम्पोमध्ये चार कोटी ३० लाख रुपयांची रोकड सापडली. याठिकाणी एका टेम्पोमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने धाड टाकून हा टेम्पो ताब्यात घेतला. यावेळी टेम्पोमध्ये ४ कोटींची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपून अवघे काही तास उलटत नाही तोच एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे पैसे कोणाचे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात तब्बल १४२ कोटी, ७७ लाखांचं सोनं, चांदी, रोकड आणि दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५२ कोटी ७० लाखांची रोकड आहे. तर, २१ कोटी रुपयांची दारुही जप्त करण्यात आली आहे.


रायगड जिल्ह्यात ४२ ठिकाणी वाहन तपासणी नाके


विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला फार कमी काळ उरलेला असतानाच आता महाराष्ट्रात सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात ४२ ठिकाणी वाहन तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशाचं आमिष दाखवून मत विकत घेतलं जातं. यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ठिकठिकाणी तपासणी पथक तैनात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारची प्रलोभनं दाखवून चुकीच्या पद्धतीने मतदारांना भुलवण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी म्हणून तैनात करण्यात आलेल्या या तपासणी पथकाने अलिबाग, पनवेल, कर्जत, श्रीवर्धन या ठिकाणावरून आतापर्यंत १५ लाख ९५ हजार रुपये वाहनातून जप्त केले आहेत. तर ३१ लाख १८ हजार ९९४ रुपयांची, ९६ हजार १८२ लिटर दारूही पकडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.