दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होतेय. मात्र इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याची भावना गणेशभक्तांची आहे. यावर्षी मात्र काहीसं वेगळं चित्रं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल मातीत साकारलेली बाप्पाची ही सुंदर मूर्ती. दिसायला साधीशी असली तरी भडक रंग आणि दागदागिन्यांनी मढलेल्या मूर्तींपेक्षाही आकर्षक. मात्र या मूर्तीचं वैशिष्ट्य तिला सर्वांपेक्षा वेगळं ठरवते. या मूर्तीचं विसर्जन घरच्या घरी, झाडाच्या कुंडीतच करायचं आहे. विशेष म्हणजे विसर्जन झाल्यावर त्यात तुळस उगवते. कारण लाल मातीच्या गणरायाच्या मूर्तीत आहे तुळस आणि भेंडीच्या बिया. 


वरळीत राहणाऱ्या दत्ताद्रू कोतूर या ३० वर्षीय युवकाची ही संकल्पना. याआधी त्यांनी प्रयोग म्हणून एकच मूर्ती तयार केली. मात्र गणेशभक्तांचा वाढता प्रतिसाद पाहता आता गणेशमूर्तींचा सुसज्ज कारखानाच तयार झालाय. ८ इंचांपासून ते १८ इंचांपर्यंत गणेशमूर्ती साकारल्या आहेत. २२०० ते ४००० रूपये किंमतीच्या या मूर्ती आहेत. 


ट्री गणेशा असं या मूर्तीचं नाव आहे. सेलिब्रिटींचीही याला पसंती मिळतेय. ऋतिक रोशन, रितेश देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाऊ कदम, सागर करंडे अशा अनेक सेलिब्रिटींनी यंदा ट्री गणेशाला पसंती दिलीय. अगदी मुख्यमंत्र्यांनीही या गणेशमूर्तींचं कौतुक केलंय. तसंच झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनीही ट्विट करून या गणेशमूर्तींचं कौतुक केलं. 


ही एक अभिनव कल्पना आहे. अशा मूर्तींची स्थापना करावी अशी विनंती मी भाविकांना करेन. अशा मूर्तींमुळे श्री गणेश केवळ १० दिवस नाही तर कायमचे आपल्यासोबत राहतील, असे दत्ताद्रू कोतूरने यावेळी सांगितले


आपल्या अराध्य दैवताचा उत्सव उत्साहात पार पडण्यासाठी भाविक सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पण पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अशा उपक्रमांना भरभरून पाठिंबा मिळणंही गरजेचं आहे.