मुंबई : ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात गोवून, गरज नसताना राज्य आणि देशातली स्थिती बिघडवण्याची आवश्यकता नव्हती, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे भाजपने या कारवाईचे समर्थन केले आहे. ईडीने त्यांचे काम केले आहे. यात आमचा हात नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर द्या संभ्रम मिटवा, असे प्रत्युत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यांनी पवारांना आव्हान आहे. तर कर नाही तर डर कशाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कर नाही तर डर कशाला? यातून कोणालाही काहीही फायदा होणार नाही, असे  चंद्रकांत पाटील म्हणालेत. लोक हुशार आहेत, सूज्ञ आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळतो. ईडीचे काम त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. ईडी स्वायत्त संस्था आहे, असे ते म्हणालेत.


दरम्यान, शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचे टाळले. पोलीस आयुक्त मला भेटून गेले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती त्यांनी केली. मी गृहखाते सांभाळले आहे, माझ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामान्यांना त्रास होऊ नये, म्हणून मी ईडी कार्यालयात जायचा निर्णय तहकूब केला अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.